पुणे : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. एकीकडे नागपुरातील पेपर फुटीचं प्रकरण राज्यात गाजत असताना पुणे जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुणे बोर्डाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर
मिळलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत गंभीर प्रकार उघड झाला आहे. गणित भाग-1 आणि भाग-2 चे पेपर परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गणित भाग-2 चा पेपर तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आल्याचे यात आढळले आहे. परिणामी, बोर्डाने अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळल्याचे स्पष्ट झाले आहे.
परीक्षेपूर्वीच बोर्डाचा पेपर लीक, ॲडमिनसह ग्रुप सदस्यांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुप ॲडमिन व सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, विद्येचे महेरघर असलेल्या पुण्यात हा सर्व प्रकार घडल्याने शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. मात्र बोर्डाचा पेपर परीक्षेपूर्वीच लीक कसा काय झाला? यात नेमकं कुणाचा हात आहे? असे अनेक प्रश्न या निमित्याने आता उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी मुख्यसूत्रधार शोधून काढणं हे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
पेपरचे चिट दगडात गुंडाळून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा; गेवराईतील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरील प्रकार समोर
बीडच्या गेवराईतील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या कॉपी पुरवठ्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय. यंदाच्या बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पावलं उचलली. परंतु पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आले. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला. पेपरचे चीट एका दगडात गुंडाळून खिडकीद्वारे फेकण्याचा प्रकार यातून दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणात 17 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागात हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.